महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील एक गाव म्हणजे मोडनिंब होय. गाव तसं छोटसं पण शिक्षण, संस्कृती आणि माणुसकी जपणारे एक गाव. मोडनिंबमध्ये असणारा राजवाडा ऐतिहासिक वारसा जपणारी साक्ष आहे. या गावात हिंदू, मुस्लिम, हरिजन, जैन या सर्व धर्माची लोकं आनंदाने राहतात. याची ओळख गावात असणारी वेसच करून देते. म्हणजे बरोबर वेसीसमोर मारुतीचे मंदिर असून लगेच त्या शेजारी मशीद आहे. ही सांस्कृतिक आणि धार्मिक एकता फक्त या गावातच बघायला मिळते. गावातील सर्व लोकांचे आनंदाचे आणि प्रसन्नतेचे ठिकाण म्हणजे गावाचा रक्षणकर्ता वेताळ बाबा,वेताळ साहेब…
गावातील सांस्कृतिक सलोखा जपणारी, कितीही लांब गेलो तरी गावाकडे आपल्या माणसांकडे येण्याची ओढ लावणारी, प्रत्येक मुलीला माहेरी यायची ओढ लावणारी, बालपणीच्या सख्यासोबतींना भेटून पुन्हा एकदा मन बालपणात घेऊन जाणारी, गावातील वातावरण एकदम मस्तपैकी आनंदी करणारी गोष्ट म्हणजे इथल्या वेताळ साहेबाची यात्रा.
वेताळ बाबा ओढ्यात उंच पारावर, चिंचेच्या झाडाच्या सावलीत राहतो. तो पार चढून नैवेद्यनारळ केला जातो. इथं राहूनच तो सगळ्यांचे रक्षण करतो आणि त्यांच्या मदतीला धावतो. वेताळबाबाची यात्रा सलग पाच दिवस भरते. यात्रेपूर्वीच पूर्ण पारावर रंगकाम करून चित्रे काढली जातात, ती चित्रे वेताळ बाबाची ओळख करून देतात, ती चित्रे प्रत्येकांचे लक्ष वेधून घेतात. नंतर पारावर लाईटिंग च्या माळा लावल्या जातात. यासोबतच गावातील मारुती मंदिर, मशीद, जैन मंदिर, महादेव मंदिर, खंडोबा, अंबाबाई मंदिर, यमाई मंदिर, मरीआई मंदिर ही सर्व मंदिरे स्वच्छ करून रंगवून त्याला सुद्धा लाईटिंग केली जाते आणि यासोबतच गावातील प्रत्येक घरी साफसफाई करून घर सजविले जाते. सगळीकडे शब्दांत सांगता येणार नाही असे चैतन्यदायी वातावरण असते, यावेळी वाटतं स्वर्गातील देव पृथ्वीवर येऊन तो इथल्या सगळ्या लोकांना स्वर्ग सुखाचा अनुभव देतोय…
वेताळ बाबाची यात्रा वैशाख महिन्यातील बुद्ध पौर्णिमेला सुरू होते. खरं तर नृसिंह जयंतीलाच यात्रा सुरू होते. नृसिंह जयंतीला संध्याकाळी चावडी जवळ राहणाऱ्या मूळकाच्या वाड्यातून देव आणायचा कार्यक्रम ढोल ताशाच्या गजरात मोठया उत्साहाने संपन्न होतो. देवासोबत देवाचा घोडा, देवाची काठी पालखीतून घेऊन गावचे गुरव पारावर देवाची स्थापना करतात. यानंतर सर्व गावकऱ्यांसोबत देवाची आरती केली जाते.
दुसरा दिवस म्हणजे बुद्ध पोर्णिमा आणि यात्रेचा मुख्य दिवस. यादिवशी देवाला पहाटे महाभिषेक घातला जातो. त्या दिवशी पहाटे लवकर उठून गावातील स्त्रिया ( पुरुष ) अंघोळ करून ओल्या कपड्यावर देवाला लोटांगण घालायला येतात. यादिवशी पुरणपोळीचा गोड नैवेद्य करून दाखविला जातो.
घरातील सर्व मंडळी नवी कपडे घालून देवाला मोठया उत्साहाने नैवेद्य घेऊन जातात. यादिवशीच देवाचा छबिना वाजतगाजत काढला जातो. यादिवशी बुद्ध पोर्णिमेची संधी साधून बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची मिरवणूक मोठया थाटातमाटात काढली जाते. याचवेळी गावातील लोकांच्या शेरण्या निघतात. कुणाची असचं शेरणी असायची तर कुणाची नवसाची…शेरणीमध्ये आपल्या इच्छेने देवाला गूळ, साखर, पेढे, कपडे, नारळाचे तोरण अर्पण करतात. शेरणी वाजतगाजत आणली जाते. संध्याकाळी आगामी भाकणूक केली जाते, यासाठी मोठया संख्येने लोक उपस्थित राहतात.
दुसऱ्या दिवशी सकाळी देवाची भव्य मिरवणूक ढोल ताशांच्या गजरात वाजतगाजत काढली जाते. यामध्ये गावातील सर्व पुरुष मंडळी उत्साहाने भाग घेतात. यादिवशी भेदी गाणी व कलगीतुरा यांचा कार्यक्रम साजरा केला जातो. सोंगाच्या गाड्या बघायला मिळतात. डोळे दिपवणारे शोभेचे दारूकाम केले जाते. रात्री आकाशात शोभेचे दारूकाम म्हणजे खरोखरच त्या आकाशाला शोभा येते आणि ते आकाश चमचमते. तेव्हा खरोखरच “लखलख चंदेरी तेजाची सारी दुनिया” याची प्रचिती याठिकाणी येते. दुसऱ्या दिवशी दुपारी जंगी व भव्य कुस्त्यांच्या स्पर्धा आयोजित करून त्यासाठी पारितोषिक ठेवले जाते. यानंतर पैलवानांची वाजतगाजत मिरवणूक काढली जाते.
यात्रेत खेळणी, मिठाई, ज्वेलरी, घरगुती वस्तू, नारळ, फुले यांची दुकाने असतात. सर्वप्रकारचे पाळणे येतात. सर्व मुले पिपाणी वाजवत पाळण्यात बसण्याचा आनंद घेतात. सर्वजण रात्री भेळ, पाणीपुरी, भजी, वडा यांचा आस्वाद घेतात आणि खरेदीचा आनंद घेतात. या यात्रेत ऊसाचा रस विकणारे दुकान श्रीक्षेत्र बाळे येथून येते; जवळ जवळ 30 ते 35 वर्षे झाली हे दुकान आपली सेवा या यात्रेला देत आहे. यात्रेत रोज संध्याकाळी विविध मराठी चित्रपट, नाटकं, कीर्तन, भजन, ऑर्केस्ट्रा हे कार्यक्रम आयोजित केले जातात. यांत देशातील विविध कलाकार आपली कला सादर करतात. यात्रेनिमित्त सर्व भक्तांना रोज महाप्रसाद दिला जातो आणि तो ही राजवाड्यात…
यात्रेचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे सोंगाच्या गाड्या. डोळ्याचे पारणे फेडणारे, आपण एका वेगळ्याच विश्वात असल्याची जाणीव करून देणारी गोष्ट म्हणजे सोंगाच्या गाड्या…. यांत पौराणिक व डिजिटल अश्या सोंगाच्या गाड्या गावभर निघतात. पौराणिक सोंग बैलगाडीतून काढली जातात. सोंगाच्या गाड्यांमध्ये संत, देव,ऋषीमुनी, विनोदकार, नेते, काल्पनिक सोंगे काढली जातात. करमणूकीसोबतच कोणतेही प्रशिक्षण न घेतलेल्या या खेडेगावातील कलाकारांच्या अभिनयाची अविश्वसनीय व अविस्मरणीय प्रचिती येते. सर्वांनी एकदा तरी ही सोंगे याची देही याची डोळा पहावीच…
या यात्रेचं दुसरं एक महत्वाच वैशिष्ट्य म्हणजे भेदी गाणी (भेदक गाणी) आणि कलगीतुरा. लोप पावत चालल्या लोककलांचे दर्शन या यात्रेत होते. कितीतरी जणांना ही आपली लोककला आहे हे पण माहीत नसेल. यात्रेत सकाळी भेदी गाणी म्हणजे शाहीर वाद्य, संगीताच्या मदतीने मोहित करणारी कथा ऐकवितात. कलगीतुऱ्याचा सामना गावातील माहिती असणाऱ्या लोकांच्या समवेत हा कार्यक्रम साजरा होतो. यांत शाहीर आपल्या सुरेल आवाजात प्रश्न सादर करून समोरच्याला आव्हान करतात. अशाप्रकारे मन प्रसन्न करून टाकणाऱ्या लोककला इथे पाहायला मिळतात.
या यात्रेचे मुख्य आकर्षण म्हणजे म्हणजे वेशीतून आत आले की, देवाच्या पारासमोर वरती रस्त्याच्या कडेला मंडप टाकला जातो आणि त्यातून एक आवाज न थांबता कानी येतो आणि तो आवाज ऐकला तरच वाटते की यात्रा भरली आहे….तो आवाज असा; “आपण आलात धन्यवाद!! धन्यवाद!!धन्यवाद!!”
ज्याला कुणाला नवसाच्या तोफा व देणगी द्यायची त्यांनी स्टॉलकडे या… असं म्हणून ते काका परत देणगी व तोफा देणाऱ्याचे नाव पुकारत म्हणतात; “या भक्तांकडून एवढया रुपयांची देणगी मिळाली व या भक्तांकडून एवढया एवढया तोफांची सलामी…याबद्दल यात्रा पंचकमिटीकडून धन्यवाद!धन्यवाद!!धन्यवाद!!!”
खरोखरच ही यात्रा नाविन्यपूर्ण, कलापूर्ण आहे. आध्यत्मिकता, आधुनिकता, वैविध्यपूर्ण असूनपण एकतेचे दर्शन घडविणारी, जुन्या लोककला जोपासणारी, खेडेगावातील प्रेम, जिव्हाळा आणि तो ही शुद्ध यांची प्रचिती देणारी आहे. या यात्रेला एवढं आनंददायी बनविण्यामध्ये सर्व गावकऱ्यांचा महत्वाचा वाटा आहे. सर्व गावकऱ्यांचे मनापासून अभिनंदन… सर्वांच्या इच्छा वेताळबाबा पूर्ण करो, मोडनिंब गाव स्वच्छ, निरोगी, समृद्ध होवो, या गावाची आर्थिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, राजकीय, सामाजिक प्रगती होवो, वरूण राजा प्रसन्न होऊन शेतकरी राजा सुखी होवो हेच वेताळ बाबाकडे मागणे मागूया…
वेताळ साहेबाच्या नावानं चांगभलं!!!
FAQ
- वेताळ बाबा मोडनिंब यात्रेचे मुख्य आकर्षण कोणते असते?
- मोडनिंब मध्ये कोणत्या लोककला जोपासल्या जातात?
हे पण वाचा