खरचं आज काहीतरी लिहावं तर वाटतयं, पण मनाची घालमेल सुरु आहे.. लिहावं की नाही..कारण या लेखात सगळ्यांच्याच भावना जाग्या होतील कदाचित….
खरचं बाळ पोटात असतं तेव्हा सगळं जग म्हणत तुला मुलगा होईल, तुला मुलगी होईल..पण माझं बाळ सुखरूप माझ्या कुशीत यावं असं फक्त त्या आईला वाटतं; त्या आईच्या मनात मुलगा/ मुलगी ही घालमेल मुळी नसतेच. ती फक्त तिच्या बाळाचा विचार करते…
मुलगी घरात हसते, रडते, रुसते, हट्ट करते, सगळ्यांना जीव लावते, घराला घरपण देते, पण तिच मुलगी वयात आली तर आईची किती घालमेल होते… मुलीच्या त्या नाजूक मनाला किती आणि कसं समजून सांगायचं हेच आईला समजत नाही, पण यावेळीच आई ही मुलींसाठी बेस्ट फ्रेंड होते…
मुलीचं लग्न ठरलं की, आईवडिलांच्या जीवाची किती घालमेल होत असेल हे तर त्यांनाच माहिती… आपल्या मुलीला सगळे समजून घेतील ना? तिला तिथं सगळं जमेल ना? तिचे इथं जसे हट्ट पुरविले जातात तसंच तिथं असं घडेल का? सगळ्यांत महत्त्वाचं म्हणजे ती पण त्यांना समजून घेईल ना? अशा किती तरी प्रश्नांची घालमेल आईवडिलांच्या मनात सुरू असते…. प्रत्येक मुलीची सासरी खूप घालमेल होत असते.. पण होणारी ती घालमेल आईवडील काळजी करतील म्हणून त्यांना सांगू शकत नाही, नवऱ्याला वाईट वाटेल म्हणून त्यांना सांगू शकत नाही, दुसऱ्या कोणाला सांगावं म्हटलं तर तेच माझं हसू करतील असं प्रत्येक मुलीला वाटतं…
सासरी मोठ्याने खळखळून हसतानासुद्धा तिची घालमेल होते, आवडीचा एखादा पदार्थ खावा की न खावा, माहेरच्या फोनवरून मनसोक्त गप्पा माराव्यात की नको.. कधीतरी स्वयंपाक न करता मनसोक्त बाहेर जेवायला जायचं का नाही.. स्वतः साठी वेळ द्यायचा की नाही.. कधीतरी गाणं गुनगुणायचं की नाही.. कंटाळा आला म्हणून चार दिवस माहेरी गेलं तर लगेच दुसऱ्या दिवशी तिला सासरची सगळी माणसं समोर दिसतात आणि तिला वाटतं एकच दिवस माहेरचा बरा, इथं पण तिच्या मनाची घालमेल सुरू होते सासर की माहेर.. (सगळ्याच माझ्या मैत्रिणींची होणारी घालमेल म्हणजे शेंगदाणे भाजताना दोन शेंगदाण्याची चव चाखून बघावी की नको) साडी घालावी की ड्रेस, मनातलं काही बोलावं की नको.. आवडणारी साडी घ्यावी की नको, आलेल्या पाहुण्यांना कसं समजून घ्यावं? कारण किती पण छान पाहुणचार केला तर शेवटी त्या मुलीलाच दोष देतील अशा हजारो प्रश्नांची घालमेल रोज प्रत्येक मुलीच्या मनात असते, पण प्रत्येक मुलगी ती घालमेल आनंदाने सोडवून सुखाचा संसार करते..
तिच्याकडे बघून आपल्यातीलच एकदोघींना वाटते की, एवढी सुखी ही कशी काय असेल.. यातही त्यांची घालमेल सुरूच असते…(आता सगळ्यांचे विचार बदलले आहेत, प्रत्येक मुलगी आपल्या आई-वडिलांप्रमाणे सासू-सासऱ्यांना जपते काळजी घेते, सासरचे पण तिला मुलगी म्हणून समजून घेतात.. पण अजूनही बऱ्याच मुलींना खूप काही सहन करावं लागतंय मगच तिच्या मनाची घालमेल होते आणि जगताना तिचा श्वास गुदमरतो तरी पण ती बहाद्दरीण न डगमगता आनंदाने जीवन जगते.)😊👍