गव्हाच्या पिठाच्या गोड कापण्या | आकाड तळणे स्पेशल

  जे खेडेगावात राहतात, त्यांना सगळ्यांना माहीत असेल की, आपल्याकडे आषाढ महिन्यात आकाड तळणे हा प्रकार केला जातो. आकाड बनवून सगळ्यांना तो वाटला जातो, त्यातील एक प्रकार म्हणजे कापण्या…. हा लेख वाचून बऱ्याचजणींना आपले बालपण, आजी, शेजार, आकाड घेऊन येणारी आजी, मामा, मावशी नक्कीच आठवतील….

साहित्य:-

*गव्हाचे पीठ,

*2 चमचे बेसन,

*4 चमचे हुरडा दळून आणलेले पीठ, हे नसेल तर ज्वारीचे पीठ,

*गूळ (अर्धा किलो), गोड पाहिजे असेल तर प्रमाण वाढविणे.

*मोहन म्हणजे गरम तेल,

*वेलची पूड,

*बडीशेप पूड,

*खसखस,

*तेल,

*फिरकीचा चमचा (शंकरपाळीचा चमचा)

पाककृती:-

*एका पातेल्यात एक पेला पाणी घेऊन त्यात गूळ, वेलची, बडीशेप पूड टाकून गूळ विरघळेपर्यंत गॅसवर ढवळत ठेवणे.

*हे मिश्रण थंड झाले की त्यात लागेल तेवढेच गव्हाचे पीठ, बेसन, ज्वारीचे पीठ घालून त्यात गरम तेल घालून घट्ट व मऊ मळून घेणे.

*एक एक गोळा घेऊन त्यावर खसखस लावून चपाती लाटल्यासारखा लाटून घेणे आणि फिरकीच्या चमच्याने शंकरपाळी आकारात कापून घेणे.

*तेल गरम झाले की मध्यम आचेवर कापण्या तळून घेणे आणि थंड झाल्या की गोड कापण्या खाव्यात आणि आपल्या आवडीच्या लोकांना पण चव चाखायला नक्की द्याव्यात…

महत्त्वाची टीप :-

          जर कापण्या कडक कुरकुरीत पाहिजे असतील तर पातळ लाटणे आणि मऊ पाहिजे असतील तर जरासे जाड लाटणे. जर कापण्या करताना कोणीच मदतीला नसेल तर थोड्या कापण्या करून पेपरवर किंवा स्वच्छ कपड्यावर झाकून ठेवून असं करत सगळ्या कापण्या करून घेऊन मगच थोड्या थोडया करून सर्व कापण्या तळून घेणे, म्हणजे एकटीला जास्त वेळ पण लागत नाही आणि गॅस आणि तेलाची बचत होऊ शकते…..👍

FAQ

  1. गव्हाच्या पिठापासून खुसखुशीत कापण्या कशा करतात?
  2. गव्हाच्या पिठापासून करता येणाऱ्या पाककृती कोणत्या?

हे पण वाचा.