लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज

“राजामधील माणूस आणि माणसांमधील राजा”

दूरदृष्टी ठेऊन ज्याने समाज घडविला
शिक्षण, समता, लोककल्याण
यांचा आदर्श घालून दिला
असा लोकराजा छत्रपती राजर्षी शाहू महाराज
यांना आमुचा मानाचा मुजरा!!!

Chhatrapati Shahu Maharaj

कोल्हापूर जिल्ह्याचे भाग्यविधाते, राजामधील माणूस आणि माणसांमधील राजा, आरक्षण देणारा पहिला राजा, कुशल जलनीती तज्ञ, प्राथमिक शिक्षण मोफत करणारा राजा, कर्तव्यदक्ष लोकराजा म्हणजे राजर्षी शाहू महाराज होय.

शाहू महाराजांचा जन्म 26 जून 1874 ला कागलमधील घाटगे घराण्यात झाला. 26 जून हा दिवस ‘सामाजिक न्याय दिवस’ म्हणून साजरा केला जातो. यांचे पूर्ण नाव यशवंत जयसिंगराव घाटगे असे होते. शाहू महाराजांच्या आईचे नाव राधाबाई व वडिलांचे नाव जयसिंगराव होते. कोल्हापूर संस्थानचे राजे चौथे शिवाजी यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी आनंदीबाई यांनी 17 मार्च 1884 ला यशवंतला दत्तक घेतले. यशवंत लहानपणापासूनच कुशाग्र, न्यायप्रिय, समभाव असणारे होते. दत्तक घेतल्यावर त्यांचे नाव ‘शाहू’ असे ठेवण्यात आले. 1889 ते 1893 मध्ये धारवाड येथे व राजकोटच्या राजकुमार कॉलेज येथे त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. बडोद्याचे गुणाजीराव खानविलकर यांची मुलगी लक्ष्मीबाई हिच्याशी शाहू महाराजांचा विवाह झाला.


शाहू महाराजांनी आपल्या राजपदाचा उपयोग लोककल्याणासाठी केला. त्यांनी बहूजन समाजात शिक्षणाचा प्रसार केला. कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे केले. जे पालक आपल्या मुलांना शाळेत घालणार नाहीत त्यांना 1 रुपया दंड केला. प्राथमिक शिक्षणाबरोबरच त्यांनी स्त्री शिक्षणालाही महत्व प्राप्त करून दिले. जातिभेद दूर व्हावेत म्हणून त्यांनी आंतरजातीय विवाहाला मान्यता देणारा कायदा केला. त्याबरोबरच विधवा विवाहाला कायदेशीर मान्यता दिली. 100 मराठा धनगर विवाह शाहू महाराजांनी घडवून आणले. निपाणी येथे “डेक्कन रयत असोसिएशन” ही संस्था स्थापन केली. शाहू मिल, शेतकरी संस्था, शाहूपुरी बाजारपेठ निर्माण केली.

1896 चा दुष्काळ आणि प्लेगची साथ, हा काळ शाहू महाराजांसाठी खूप कसोटीचा काळ होता, पण ते हरले नाहीत. त्यांनी लोकांना स्वस्त धान्य दुकाने, आश्रम, दुष्काळी कामे ही कामे हाती घेतली. राधानगरी धरण, शेतकऱ्यांना कर्जे यातून त्यांनी शेतीकडे विशेष लक्ष दिले. राधानगरी धरण पाहून खरोखरच शाहू महाराजांच्या भव्यदिव्य कार्याची प्रचिती येते.

Radhanagari Dam


अस्पृश्य स्वावलंबी बनून त्यांचा आर्थिक विकास व्हावा, यासाठी त्यांना शिवण मशिन मोफत दिल्या व त्यांच्या व्यवसायाला चालना दिली. अस्पृश्य सुशिक्षित तरुणांची तलाठी पदावर नेमणूक केली. समाजातील मागासवर्गीय लोकांना विकासाच्या प्रवाहात आणायचे असेल तर त्यांना राखीव जागा देणे गरजेचे आहे, हे ओळखून त्यांनी 6 जुलै 1902 रोजी कोल्हापूर संस्थानात त्यांनी या वर्गासाठी 50 टक्के जागा राखीव ठेवल्या. संगीत, चित्रपट, लोककला, चित्रकला, कुस्ती या कलाकारांना शाहू महाराजांनी प्रोत्साहन दिले.

Read Also : 1 मे महाराष्ट्र दिनाविषयी माहिती

शाहू महाराजांनी शिक्षणाला पण खूप महत्त्व दिले. 500 ते 1000 लोकवस्तीच्या ठिकाणी त्यांनी शाळा सुरू केल्या. प्राथमिक, माध्यमिक शाळा, वसतिगृह, व्यावसायिक, तांत्रिक शिक्षण देणाऱ्या शाळा शाहू महाराजांनी स्थापन केल्या. शेतीच्या आधुनिकीकरणासाठी त्यांनी संशोधनाला प्राधान्य दिले.
शाहू महाराजांनी केलेल्या कार्याचा गौरव करण्यासाठी कानपूरच्या कुर्मी क्षत्रिय समाजाने त्यांना “राजर्षी” ही पदवी बहाल केली. 6 मे 1922 ला शाहू महाराजांचे मुंबई येथे निधन झाले. शाहू महाराजांच्या 100 व्या स्मृती दिनानिमित्त 6 मे 2022 रोजी सकाळी बरोबर 10 वाजता 100 सेकंद स्तब्ध उभे राहून त्यांना आदरांजली देण्यात आली…. 2022 हे वर्ष शाहू स्मृती शताब्दी वर्ष म्हणून साजरे करण्यात आले. यानिमित्त कोल्हापूर मध्ये शाहू मिल या ठिकाणी शाहू महाराजांच्या कार्याचा गौरव करणारे अप्रतिम प्रदर्शन भरविण्यात आले होते. यावर्षी म्हणजे 6 मे 2023 रोजी शाहू शताब्दी वर्षाची सांगता होणार आहे. 6 मे ते 14 मे 2023 या कालावधीत शाहू मिल कोल्हापूर येथे विविध उपक्रमांच्या माध्यमातून राजर्षी शाहू महाराज कृतज्ञता पर्व साजरे केले जाणार आहे.


📌राजर्षी शाहू महाराज यांचे विचार—-

  • माझी प्रजा नुसत्या प्राथमिक शिक्षणाने जरी विद्याविभूषित झाली, तर मी माझे राज्य त्यांच्या स्वाधीन करेन.
  • माझा खजिना रिता झाला तरी मला त्याची पर्वा नाही, पण माणसाला माणुसकीपासून दूर करणारी प्रथा मला मोडायची आहे.

खरोखरच राजर्षी शाहू महाराज हे राजामधील माणूस व माणसामधील राजा, लोकराजा, महाराजांचे महाराज होते. त्यांचे कार्य पाहून वाटते;

असा राजा पुन्हा होणे नाही
असा राजा पुन्हा होणे नाही…
लोकराजाला आमुचा मानाचा मुजरा🙏🙏

New Palace ,Kolhapur


  • महत्वाचे जाता जाता—-
    कोल्हापूर ला आले की न्यू पॅलेस ला नक्की भेट द्या.. इथेच आपल्याला शाहू महाराजांच्या असण्याचा भास होतो आणि यांचे कार्य आपल्याला कुणी काहीही न सांगता समजते.

FAQ

  • छत्रपती शाहू महाराजांचा जन्म कधी झाला?
  • छत्रपती शाहू महाराजांचा मृत्यू कधी झाला?
  • छत्रपती शाहू महाराजांचे पूर्ण नाव काय आहे?

हे पण वाचा