लगेच तयार होणारा, कमी साहित्य लागणारा गोड पदार्थ, मिठी चंपाकळी
आज आपण साधा सोपा, कमीत कमी साहित्य लागणारा गोड खुसखुशीत चंपाकळी (Sweet Crispy Champakali) हा पदार्थ करूया.
Table of Contents
बऱ्याचजणांना हा पदार्थ माहीत नाही. मलाही हा पदार्थ माहीत नव्हता, पण हा पदार्थ मला माझ्या सासूबाईंनी सांगितला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात आपल्या नातेवाईकांचा कोणताही छोटा मोठा कार्यक्रम असू देत त्यांना गारवा देण्याची पद्धत आहे, थोडक्यात गारवा म्हणजे शिदोरी देणे. यासाठी झटपट होणारा हा पदार्थ, स्वस्त आणि मस्त.. बघूनच तोंडाला पाणी सोडणारा, गोड आवडणाऱ्यांना तर हा पदार्थ नक्कीच आवडेल. तर हा पदार्थ म्हणजे गोड खुसखुशीत चंपाकळी…
तर आज आपण गोड खुसखुशीत, कमी साहित्यात तयार होणारा चंपाकळी हा पदार्थ तयार करूया…
गोड खुसखुशीत चंपाकळी बनवण्यासाठी लागणारे साहित्य
- मैदा अर्धा किलो
- मीठ चवीनुसार
- खायचा सोडा एक चिमूट
- साखर 300 ग्रॅम
- पाणी 1 वाटी
- वेलदोडे पूड
- पिठीसाखर एक वाटी
- मोहण म्हणजे गरम तेल किंवा तूप अर्धी वाटी
चला सगळे साहित्य आपण जमवले आहे. मैदा चाळून घेऊन त्यात मीठ, सोडा, तूप किंवा तेलाचे मोहन घालून पीठ मऊसर मळून ठेवूया.. हे पीठ पंधरा मिनिटे झाकून भिजत ठेवूया..
तर सर्वात आधी आपण साखरेचा पाक करून घेऊया…
एका पातेल्यात 300 ग्रॅम साखर घेऊन त्यात एक वाटी पाणी घेऊन साखर विरघळेपर्यंत गॅस मोठा करणे, त्यानंतर गॅस मध्यम करून एक तारी पाक करून घेणे. हा पाक थंड करण्यास ठेवणे.
(वाटीचे माप प्रत्येक घरी वेगळे असणारं त्यामुळे साखर भिजून वरती थोडे पाणी घेणे)
Read also :- गव्हाच्या पिठाच्या गोड कापण्या | आकाड तळणे स्पेशल
चंपाकळी करण्याची कृती
आता आपण चंपाकळी करायला सुरुवात करूया..
पीठ चांगले मऊ करून घेऊया. एक छोटासा गोळा घेऊन त्याची पुरी लाटून घेऊया. या पुरीच्या थोडे वर व थोडे खाली अंतर ठेवून फिरकीच्या चमच्याने उभ्या रेषा मारून घेऊया. यानंतर ते अलगदपणे गोलाकार दुमडून वरखाली सोडलेले जोडून घेणे.
एक एक पुरी करून चंपाकळी करायला खूप वेळ लागतो. म्हणून एक मोठी चपाती लाटून त्यावर फिरकीच्या चमच्याने उभ्या रेषा मारून घेणे आणि बरोबर मध्यभागी एक आडवी रेष मारून घेणे. आता एकत्र पाच ते सहा पदर किंवा पाकळ्या जोडून चंपाकळीचा आकार देणे. आधी सर्व चंपाकळ्या तयार करून घेणे.
आता गॅसवर कढई ठेऊन तेल गरम करून घेणे. मध्यम आचेवर चंपाकळ्या तळून घेणे आणि लगेच पाकात बुडवून लगेच दुसऱ्या एका ताटात ठेवणे. यानंतर यांवर पिठीसाखर थोडीशी भुरभुरणे. थोडया थोड्या चंपाकळ्या तळून पाकात बुडवून लगेच त्यावर पिठीसाखर भुरभुरणे.
अशा प्रकारे दिवाळीस्पेशल किंवा कधीतरी काहीतरी नवीन काहीतरी करून खाऊ वाटते, अशावेळी आगळावेगळा गोड पदार्थ नक्की करून बघा.