हुलग्याचं माडगं | कुळथाचं माडगं | पाककृती

Hulgyache Madage | Recipe in Marathi | Healthy Wealthy food

आज आपण हुलग्याचं माडगं कसं बनवायचं हे बघूया…

सर्वांत आधी आपल्याला हुलगे (कुळीथ) स्वच्छ निवडून भाजून गिरणीतून त्याचे पीठ दळून आणावे लागेल.

साहित्य:-

  • 1 वाटी हुलग्याचे पीठ
  • 250 ग्रॅम गूळ
  • मीठ चवीनुसार
  • अर्धा चमचा सुंठ पावडर
  • तांदूळ अर्धी वाटी
हुलग्याचं माडगं

कृती:-

  • सर्वात आधी आपल्याला 1 वाटी हुलग्याचे पीठ 15 ते 20 मिनिटे पाण्यात भिजवून ठेवावे लागेल.
  • 2 ते 3 तांबे पाणी उकळून घेऊन ज्यादाचे थोडे पाणी काढून ठेवू. पुन्हा गरजेनुसार वापरता येऊ शकते.
  • पाणी उकळले की त्यात तांदूळ स्वच्छ धुवून थोडासा अर्धा कच्चा शिजवून घेणे व त्याचवेळी चवीनुसार मीठ घालणे.
  • यामध्येच गूळ, सुंठ पावडर घालून गूळ विरघळू द्यावा, गॅस मात्र मध्यमच ठेवायचा आहे.
  • यानंतर भिजवलेले पीठ घालून बारीक गॅस करून 10 ते 15 मिनिटे ठेवणे.
  • तयार झालेले माडगे गरम गरम पिणे.

Read also :- गव्हाच्या कापण्या पाककृती


पूर्वीचे लोक सर्दी झाली की मस्त आणि स्वस्त माडगं प्यायचे आणि निरोगी, आनंदी जीवन जगायचे. सर्वांना निरोगी आरोग्यासाठी खूप खूप शुभेच्छा🙏

गोष्ट एका वाटीभर माडग्याची

खूप वर्षांपूर्वी आपल्या महाराष्ट्रात दुष्काळ पडला होता. लोकांना खायला अन्न आणि प्यायला पाणी सुद्धा मिळत नव्हते. माणसांसोबतच जनावरांची सुद्धा हाल सुरू होते. खरंच त्या गावात दुष्काळ पडलाय का? हे शासनाने बघायचे ठरवले आणि काही शासकीय अधिकारी त्या गावात भेट द्यायला आले. आता शासकीय अधिकारी आल्यात म्हटल्यावर त्यांचा पाहुणचार करणं गरजेचं होतं. ते अधिकारी गावकऱ्यांना म्हणाले गरीबातल्या गरीब घरी मला घेऊन चला त्यावरूनच मी ठरवतो की दुष्काळाची तीव्रता किती आहे ते….

मग गावकरी त्या अधिकाऱ्यांना एका घरी येऊन गेले. घरी अधिकारी आल्यात म्हटल्यावर त्याच्याकडे त्यांना करण्यासाठी तर काहीच नव्हते. शेवटी त्याच्या पत्नीने घरात असलेल्या हुलग्याच्या पिठाचे माडगे करून त्या अधिकाऱ्याला एका वाटीत दिले. अधिकाऱ्याने ते माडगे पिल्यावर आपल्यावरील अधिकाऱ्यांना असे सांगितले की; या गावात दुष्काळ वगैरे काही नाही, येथील लोक आपल्यापेक्षा कितीतरी चविष्ट आणि स्वादिष्ट सूप करून पितात. यावरूनच आपल्याला अंदाज आला पाहिजे की; या गावात कोणतीही दुष्काळाची योजना देऊ नये.
पूर्वीच्या काळी लोक सर्दी, खोकला घालविण्यासाठी माडग प्यायचे. आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहे हे माडगे… आताच्या पिढीला हे नावसुद्धा माहीत नसेल, म्हणूनच याची पाककृती दिली आहे, एकदा नक्की करून बघा.

हे पण वाचा:-