माझी यशस्वितेची परिभाषा | तुमच्या मते यशस्वी होण्याची परिभाषा काय आहे ?

माझी यशस्वितेची परिभाषा काय ते मी लेखात सांगायचा प्रयत्न करणार आहे.

“यशस्विता मिळविणे असते
जगण्याची लढाई,
प्रत्येकाच्या ठायी असते
निराळीच परिभाषा यशस्वितेची, यशाची
अन् यश मिळविण्यात असते
भलतीच कठीणाई.”

“यशस्विता म्हणजे आपल्या जीवनाच्या कोणत्याही कार्यक्षेत्रात आपण समाधानपूर्वक उच्चतम व उत्कृष्ट दर्जाची पातळी संपादन करणे होय.” जेवढ्या व्यक्ती तेवढ्या व्यक्तींची यशस्वितेची परिभाषा, त्याबद्दलचे विचार हे भिन्न-भिन्न असणारच. याप्रमाणेच माझी पण यशस्वितेची व्याख्या, परिभाषा ही इतरांहून निराळीच असणार यांत काही शंका नाही.
ज्यावेळी आपण शाळा, कॉलेजमध्ये जातो, खूप पुस्तके वाचतो, सर्व विषयांचे सखोल ज्ञान आत्मसात करतो, सर्व उपक्रमांमध्ये सहभाग घेतो, सर्व विषयांमध्ये first class मिळवितो, खुप मेहनत करून एका उच्च पदावर नोकरी करतो आणि आपल्या घरच्यांची अपेक्षा पूर्ण करतो इथचं आपण प्रत्येकजण यशस्विता मिळाली असे मानतो. पण माझ्या मते प्रत्येक व्यक्तीची त्या त्या क्षेत्रानुसार यशस्विता असणार.

माझी यशस्वितेची परिभाषा


ज्यावेळी आपण रेल्वे स्टेशनवर गाडीची वाट पाहत असतो, त्यावेळी त्याठिकाणी एक गरीब आई आपल्या मुलासाठी खाऊ मागते, एखादे आजोबा पाय नसल्यामुळे तसेच सरपटत सरपटत पोटासाठी दोन घास मागतात, कितीतरी अनाथ मुलं मळक्या कपड्यांसह ते नाजुक, कोमल हात आपल्यापुढे पसरवितात, आपलं वय झालेलं असून पण पोटासाठी चार पैसे मिळावेत म्हणून रणरणत्या उन्हात मोठं ओझं पाठीवर घेवून तसंच वाकून चालणारे मजूर आजोबा हे सर्व पाहून ज्यावेळी आपल्या हृदयाला स्पर्श होईल व आपण या सर्वांना समाधानाने मदत करू आणि मदत केल्यानंतर या सर्वांच्या चेहऱ्यावरील एक स्मित हास्य व त्यांच्या डोळ्यातील बोलके भाव आपल्याला जगण्याची नवी उमेद देतील, तेव्हाच आपण यशस्विता मिळवितो.

Read also :- ‘ति’च्या मनाची घालमेल


एखादी गृहलक्ष्मी जेव्हा आपल्या घरातल्या सर्वांचा विचार करते, काळजी घेते, आपण स्वतः आजारी असलो तरी सर्वांना समाधानी व आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करते, सासरच्या माणसांनाही मायेची ऊब देवून त्यांना आपलसं करते आणि आपली नाती मायेच्या रेशीम धाग्यात बांधून ठेवते, तेव्हाच ती गृहलक्षी यशस्विता मिळविते.
ज्यावेळी आई-वडील दोघेपण 12-12 तास काम करून आपल्या मुलांना शिक्षणाच्या सर्व सोयी पुरवितात आणि त्याचबरोबर मुलांना प्रामाणिकपणा, आनंदी वृत्ती, आहे त्यात समाधानी राहणं, जीव ओतून कोणतेही काम करणे, पैशापेक्षा माणसांची मन जपायला शिकविणारे संस्कार आई-वडील देतात. ही मुलं पण कितीही मोठं झालं तरी आई-वडीलांचा आदर करतात, त्यांना समाधानी ठेवतात, त्यावेळीच ते आई- वडील व मुलं यशस्विता मिळवितात.
दरवर्षी किती तरी विद्यार्थ्यांचे जीवन शिक्षक फुलवितात. त्यातील एखादा विद्यार्थी उच्च पदस्थ अधिकारी बनतो आणि ज्यावेळी त्याचे शिक्षक त्याच्याकडे जातात तेव्हा तो उच्च पदाच्या खुर्चीवरून उठून गुरूंना नम्रपणे वंदन करतो व म्हणतो की, “आज मी इथं ज्यांच्यामुळे आलोय, ते हेच माझे शिक्षक.” त्याचवेळी शिक्षक व विद्यार्थी यशस्विता मिळवितात.
एखादे डॉक्टर खुप प्रयत्न करून एखादी शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडतात, त्या रुग्णाला जीवदान देतात व तो घरी जाताना आनंदाने म्हणतो, “आज पुन्हा एकदा मला जगण्याची संधी मिळाली, ती फक्त तुमच्यामुळेच हं डॉक्टरसाहेब” याचवेळी ते डॉक्टर यशस्विता मिळवितात.
एखादा विद्यार्थी पुस्तकी ज्ञानात जरा मागेच असतो, पण तो माणुसकी जपतो, जीवनातील गोड- कडू अनुभव घेवून जीवन आनंदी बनवितो आणि त्याच वेळी त्यांचे शिक्षक म्हणतात; “अरे तू शालेय लढाईत कमी पडलास पण जीवनाच्या लढाईत मात्र उत्कृष्ट श्रेणी घेतलास!” तेव्हा तो विद्यार्थी खरोखर यशस्वी होतो. ज्यावेळी खूप लखपती असणारी व्यक्ती सामान्य लोकांमध्ये मिसळून त्यांचे दुःख जाणून घेवून त्यांच्यातीलच होवून जाते, जी व्यक्ती दगडात देव न शोधता माणसांना जपते, त्यांची मन जपते, निरागस व लुळ्यापांगळ्यांना मदत करते, जी व्यक्ती देशाचे नियम पाळून देशहिताच्या कार्याचा वसा होते, जी व्यक्ती पर्यावरणाचे रक्षण व्हावे म्हणून योग्य त्याच गोष्टी करते अशाच व्यक्ती यशस्विता मिळवितात.
जेव्हा शेतकरी जमीन स्वच्छ करून बी पेरतो व त्यास हवा तसा पाऊस होऊन पिक सोन्या- सारखं येतं आणि शेतकऱ्याला पाहिजे त्याच किंमतीला विकलं जातं आणि शेतकरी समाधानानं घरी येवून दुसऱ्या पिकासाठी सज्ज होतो, तेव्हाच तो शेतकरी आपली व आपल्या धरणी मातेची यशस्विता मानतो.
ज्यावेळी औषध निर्माते खुप मेहनत करून एखाद्या रोगावर औषध शोधून काढतात व त्यांच्या औषधाने ज्यावेळी एखादा रुग्ण मरणाच्या दारातून परत येवून जीवन फुलवू लागतो तेव्हाच औषधनिर्माते यशस्विता मानतात.
ज्यावेळी एखादा समाजसुधारक खूप प्रयत्न करून समाजातील अनिष्ट प्रथा दूर करण्याचा ध्यास घेतो व याच्यामुळेच समाजात नवचैतन्य आले तर खरोखरच तो समाजसुधारक यशस्वी होतो.
जेव्हा देशात एखादे मोठे संकट येते पण भिन्न प्रांत, भाषा, वेशभूषा असणारे लोक एकत्र येवून संकटांचा सामना करतात, तेव्हा या सर्वांच्या ‘विविधतेतून एकता’ असून पण देश यशस्विता मिळवितो.
ज्यावेळी आपल्या जीवनातील सर्व अनमोल क्षणांचा त्याग करून सैनिक जीवाची बाजी लावून सीमेवर लढतात आणि आपल्या देशाचे रक्षण करतात व आपण त्यांना ताठ मानेने सलाम करतो तेव्हाच ते यशस्वी होतात.
एखाद्याकडे खूप सुंदर कला असतात. त्याच्या कला पाहून मन तृप्त होते. मूर्तिकार किती छान सुरेख मूर्ती बनवितो ती मूर्ती पाहून क्षणभर आपला आपल्या डोळ्यांवर विश्वासच बसत नाही, सुतार सुद्धा एक- एक लाकूड जोडून किती सुरेख व अप्रतिम वस्तू बनवितो तेव्हाच हे कारागीर, कलाकार यशस्विता मिळवितात.
ज्या देशात लोक हा देश आधी माझा व नंतर सर्वांचा असे मानून एक चांगले देश- कार्य करतात, देशाच्या नियमांचे पालन करतात, सरकारी मालमत्तेचा योग्य त्याच प्रमाणात वापर करतात, टॅक्स वेळेवर भरतात, आपली खरीच माहिती योजना मिळविण्यासाठी देतात, पर्यावरण संरक्षण करतात, घर, गाव, राज्य, देश स्वच्छ ठेवतात, परस्परांबद्दल सामंजस्य दाखवितात व काहीही झाले तरी देशाचा एक सुजाण नागरिक बनतात व ज्यावेळी त्या देशातील शासनसुद्धा जे काही नागरिकांच्या हक्काचं आहे ते आपला स्वार्थ बाजूला ठेवून त्यांना देवून, त्यांचा व पर्यायाने देशाचा विकास घडवून आणतो, तेव्हाच तो देश, शासन व त्या देशातील नागरिक यशस्विता मिळवितात.
यशस्विता खूप मिळवा पण त्याचबरोबर यशस्वितेपेक्षा पण दुप्पट माणसे मिळवा. तरच आपण सर्वजण जीवनात धाडसाने यशस्थिता मिळवू. यशस्विता ही हिऱ्यासारखी असते. ती सर्व बाजूनी पाहिली की चकाकते.

“जीवन आहे अनमोल फार
व्हा सगळेच यशस्वी
या जीवनात…

घ्या उंच भराऱ्या यशाच्या..
पूर्ण करा आपल्या इच्छा-आकांक्षा..
मिळवा जीवनातील प्रत्येक क्षणांचा आनंद..
मने अन् माणुसकी जपून समाधान मिळवूया उदंड..
हीच तरी खरी आहे
यशस्विता जीवनाची!!

FAQ

  1. तुमच्या मते यशस्वी होण्याची परिभाषा काय आहे ?
  2. तुमच्या मते जीवनात यशस्वी होणे म्हणजे काय?
  3. तुमच्या मते यश काय आहे?