श्री क्षेत्र नीरा नरसिंहपूर – पौराणिक व ऐतिहासिक पर्यटन स्थळ | #2 A Legendary and Historical Tourist Spot

महाराष्ट्रातील अतिप्राचीन नरसिंह मंदिर

आज आपण श्री क्षेत्र नीरा नरसिंहपूर मंदिराला भेट देवू या. पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील हे एक नरसिंह रूपातील विष्णू मंदिर आहे.

नीरा नरसिंहपूर
नीरा नरसिंहपूर
नीरा नरसिंहपूर

पौराणिक महत्त्व

महाकाव्य महाभारताचे रचनाकार महर्षी व्यास बरेच दिवस या ठिकाणी वास्तव्यास होते. प्राचीन मंदिरांपैकी एक, अप्रतिम मंदिर, नीरा व भीमा नदीचा संगम, अतिशय आकर्षक व रमणीय ठिकाण, या क्षेत्राचा आकार सिंहाच्या नाकासारखा असल्याने या ठिकाणाला नरसिंहपूर म्हणतात. श्रीरामाने आपली पवित्र यात्रा ऋषी अगस्ती मुनी यांच्या सांगण्यावरून याठिकाणीच पूर्ण केली. समर्थ रामदासांनी याठिकाणी स्नान करून एक सुंदर व श्रवणीय कीर्तन सादर केले होते.

स्थान

पूणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात नीरा नरसिंहपूर हे गाव आहे. पुणे जिल्यातील हे शेवटचे ठिकाण आहे. या ठिकाणी असणारा नीरा-भीमा संगम अतिशय रमणीय आहे. या ठिकाणी बरेच ऋषी-मुनी येवून तपस्या करत. या ठिकाणी भक्त प्रल्हाद नृसिंहाच्या मूर्तीची भक्तीभावाने पूजा करत असे, हीच मूर्ती या मंदिराच्या गाभाऱ्यात असून ती पाहता क्षणीच आपले मन प्रसन्न करते.

ऐतिहासिक महत्त्व

श्री क्षेत्र नीरा नससिंहपूर याची मुंबई गॅझेटिअर मध्ये नोंद घेण्यात आली आहे. दरवर्षी वैशाख महिन्याच्या नृसिंह जयंतीला नवरात्र उत्सव साजरा केला जातो. या क्षेत्राला पौराणिक व ऐतिहासिक महत्त्व असून महाराष्ट्रासोबतच कर्नाटक, तेलगंणा, आंध्रप्रदेशातील लाखो लोक या देवाच्या दर्शनाला येतात. शास्त्रज्ञांनी या क्षेत्राचा अभ्यास केल्यास असे दिसून झाले की, नरसिंहपूर हे पृथ्वीचे नाभिस्थान किंवा मध्यस्थान आहे.

या ठिकाणी असणाऱ्या संगमावरील घाट त्रिमलापाळ दाधजी मुधोजी यांनी शके १५२७ ला बांधला. यानंतर १७८७ ला रघुनाथराव विंचूरकर यांनी याचा जीर्णोधार केला, याचा शिलालेखात उल्लेख आहे.

नीरा नरसिंहपूर

आख्यायिका

नारदांनी हिरण्यकशपुची गर्भवती पत्नी कयाधू हिला नरसिंहपूरी भीमा नदीच्या काठावर आश्रमात आणले. येथेच विष्णुचा महान भक्त प्रल्हाद याने वालुकामय मूर्ती बनवून ‘ओम नमो नारायणा’ असा विष्णूचा जप केला. प्रल्हादाच्या या भक्तिभावाने विष्णूंनी नरसिंह रूपी दर्शन दिले. तेव्हापासून विष्णूची ह्या रूपातील मूर्ती खूप आकर्षित व मन तृप्त करणारी आहे.

नरसिंहाची मूर्ती

नरसिंहाची ही मूर्ती पश्चिमेकडे तोंड करून सिंहासनावर विराजमान आहे. मुख, छाती, कंबर सिंहासारखे तर हात, पाय मानवी वाटतात. उजवा पाय गुडघ्यात दुमडून उभा आहे व डाव्या पायाने मांडी घातली आहे. उजवा हात उजव्या गुडघ्यावर, डावा हात कंबरेवर असून मूर्ती प्रसन्न वाटते.

तसेच दुसरी एक मूर्ती काळ्या दगडाची असून ब्रह्मदेवांनी तयार केलेली नरसिंहाची मूर्ती आहे. या मूर्तीला शामराज मूर्ती म्हणतात. यावरूनच नरहरे शामराज असा जयघोष करतात.

नीरा नरसिंहपूर

Read also :- वेताळबाबा यात्रा मोडनिंब

नीरा-भीमा संगम घाट

या संगमावरील दृश्य अतिशय देखणे व मनमोहक आहे, संगमावर स्नान करून मंदिरात येताना पायऱ्यांवर दगडात दोन हत्ती भाविकांचे स्वागत करतात. हत्ती, सिंह यांचे शिल्प तसेच मगरींचे शिल्प ही सर्वांचे लक्ष वेधून घेते. मंदिराच्या पाठीमागे श्री विष्णूंची मूर्ती सर्वांचे लक्ष वेधून घेवून त्यांच्या असण्याचा भास करून देते.

नीरा नरसिंहपूर
नीरा नरसिंहपूर
नीरा नरसिंहपूर

नीरा नरसिंहपूर येथील नित्यपूजा

श्री विष्णूची पहाटे ५ वाजता काकड आरती करून खिचडीचा नैवेद्य दाखवला जातो. प्रात: पूजेमध्ये नरसिंहमूर्ती व शामराज मूर्तीला पंचामृत स्नान घालून यथासांग पूजा केली जाते. दुपारी 12 वाजता आरती करून पुरणपोळीचा नैवेद्य दाखविला जातो. संध्याकाळी झांज, घंटा वाजवून पूजा केली जाते. रात्री ९ वाजता शेजारती करून दुधाचा नैवेद्य दाखवून, श्रीविष्णूंची क्षमा मागून पूजा करणारे प्रमुख दारे बंद करतात.

संगमावरील पवित्र क्षेत्रे

 • लक्ष्मी तीर्थ – याठिकाणी श्री लक्ष्मीचे देवालय आहे.
 • पद्म तीर्थ – लक्ष्मीने तप केल्याने तिला नरसिंह प्रसन्न झाले व त्याचबरोबर कुबेराला धनप्राप्ती येथेच झाली.
 • गो तीर्थ – कामधेनूने नरसिंहांना याठिकाणी अभिषेक घातला.
 • चक्रतीर्थ – प्रल्हादाच्या रक्षणासाठी भगवंतांनी याठिकाणी चक्र पाठविले.
 • त्यासोबतच संगमावर शंख तीर्थ, पिशाच्च विमोचन तीर्थ, नरसिंह तीर्थ, दुर्गा तीर्थ, कोटी तीर्थ, भानू तीर्थ, हंसतीर्थ, इंद्रतीर्थ ही ठिकाणे आहेत.

नीरा नरसिंहपूर मंदिरातील घंटा

भक्त प्रल्हादाच्या मंदिराच्या मागे एक प्रचंड घंटा असून ती श्री लक्ष्मी नरसिंहाची संवादिनी म्हणून ओळखली जाते. इ.स. १७३९ ला पेशवे चिमाजी अप्पांनी वसई जिंकल्यावर त्यांनी तेथील घंटा लुटून आणून त्यांनी या घंटा विविध मंदिरांना दिल्या. ही प्रचंड घंटा पैलवान बाबा याने डाव्या हाताने धरून उजव्या हाताने येथे बांधली.

नरसिंहाच्या मंदिरातील मंदिरे

शेजघर- याठिकाणी नरसिंह व शामराज यांचे दोन पलंग, गाद्या आहेत.

नरसिंह खांब – याच्या शिळेवर हिरण्यकश्यपूच्या वधाचा उल्लेख आढळतो.

 • भक्त प्रल्हाद मंदिर – काळ्या पाषाणात हात जोडून भक्त प्रल्हादाची मूर्ती आहे.
 • लक्ष्मी मंदिर – नरसिंहांच्या डाव्या बाजूला लक्ष्मीचे मंदिर आहे. तसं मूर्ती उभी आहे पण पूजा केल्यावर ही मूर्ती बैठकीतील वाटते. या मंदिराचे शिखर दगडाचे असून नीरा नदीच्या पात्रापासून १५० फूट उंच असूनसुद्धा शिखराच्या दोन दगडातून एका लहानशा छिद्रातून दिवस रात्र पाणी झिरपते, याला ‘गुप्त गंगा’ म्हटले जाते.
 • दत्त मंदिर – या मंदिराचे बांधकाम लाकडी असून पांढऱ्या संगमरवरी दगडावर दत्त मूर्ती विराजमान आहे.
 • याबरोबरच मंदिराच्या आत काळा दत्त, विठ्ठल-रुक्मिणी, भीमा शंकर, स्वामी राघवेंद्र, शालीग्राम, तरटी नरसिंह, शाकंबरी, काशी विश्वेश्वर, गणपती, रामेश्वर, काळभैरव यासारखी आकर्षक व नयनरम्य मंदिरे आहेत.
 • सोळखांबा मंदिर – संगमावरील घाटावर सोळा खांबाचे दगडी देवालय आहे. यांत मध्यभागी अश्वरूप नरसिंह, गणपती मंदिर, मारुती, शिवलिंग, वटवृक्ष आहे. देवालयाच्या समोरील बाजूला दीपमाळ व शिव मंदिर आहे.

नीरा नरसिंहपूर मंदिराला भेट कशी द्याल?-

 1. बस सेवा :- पुणे- सोलापूर बसने टेंभुर्णीला उतरून अकलूज बसने येवून संगम चौकात येऊन रिक्षाने नीरा नरसिंहपूरला यावे. पंढरपूर मार्गाने येताना अकलूज टेंभुर्णी बसने येऊन संगमला उतरून मंदिराला रिक्षाने जावे.
 2. रेल्वे सेवा – पुणे – सोलापूर रेल्वेने कुर्डूवाडीला उतरून तेथून टेंभुर्णीला बसने यावे. यानंतर अकलुजला जाणाऱ्या बसने जाऊन संगमला उतरून रिक्षाने मंदिराला जावे.

याठिकाणी भक्तांना राहण्यासाठी निवासाची, भोजनाची सोय आहे. त्यासोबतच लॉजिंगसाठी टेंभूर्णी व अकलूज जवळच आहे.

सर्वांनी कधी तरी एकदा या नरसिंहरूपातील श्री विष्णू मंदिराला नक्की भेट द्या. मंदिर व मूर्ती खूपच आकर्षक, मनमोहक व चित्तवेधक आहेत.

काही चुका असल्यास क्षमस्व–

पुणे ते नीरा नरसिंहपूर अंतर किती आहे?

१८५ किमी

नीरा नरसिंहपूर येथे कोणत्या नद्यांचा संगम आहे?

नीरा व भीमा