ए आई,
आई मी खूप थकलेय गं, कधी एकदा तुझ्या मिठीत येऊन मनसोक्त रडू वाटतयं गं,
आता शरीर पण रोज नवा त्रास देतंय आणि मनाच्या तर वेदनाच समजेना झाल्यात,
खूप भूक लागते गं पण प्रेमाने कोणीच जेव म्हणत नाही,
जेवण तर मीच बनविते पण केलेला पदार्थ मीच चाखू शकत नाही,
सगळं घर पण सांभाळते, सगळ्यांच मन पण सांभाळते, पण मी मलाच नाही गं सांभाळत,
आई इथे खूप आरोप होतात गं माझ्यावर, जे मी चुकूनही करत नाही त्याची शिक्षा देतात मला, मात्र जे करते त्याच कौतुक कधीच करत नाहीत गं,
आई तू मला नेहमी सांगायचीस की आपण चांगलं वागलं की सगळे चांगले वागतात, अगं पण इथं अस काहीच नाही गं, मी चांगलं वागलं तरी पण ते मला वाईटच ठरवितात.
मी माझं घर, माझी माणसे म्हणून सगळं करते गं, पण इथे मला परके करतात गं आणि तुम्ही पण लग्न झाले की मला परके केले, मग तूच सांग आई मला माझं आपलं कोण आहे गं?
घर सांभाळून मी बाहेर जाऊन जॉब पण करते गं,
पण आई तरीही मीच कमी पडते गं,
खूप होतात गं वेदना, मन दुखतं, कंठ दाटून येतो, श्वास पण गुदमरतो, पण मी माझ्याच घरात मुक्त श्वास नाही घेऊ शकत गं,
Read Also :- ‘ति’ च्या मनाची घालमेल
कांदा चिरतानाच मी माझ्या अश्रूंना मुक्त करते, भांडी घासताना भांड्याबरोबर दुसऱ्यामुळे मनाला झालेली मरगळ पण स्वच्छ करते गं आई…
आणि आई माझ्याकडे एक गुड न्यूज पण आहे बरं का,
अगं मी पण आई होणार आहे, पण अजून आम्ही कोणाला नाही सांगितलं गं,
मला ना गरमागरम भजी खाऊ वाटतात गं, कधी कधी खूप तिखट भाजी खाऊ वाटते गं, कधी वाटतं मनसोक्त बाहेर जावं आणि पाणीपुरी खाऊन यावी..पण अगं यातलं काहीच होत नाही गं,
इथं माझ्याऐवजी माझ्या घरच्यांनाच डोहाळे लागले आहेत आणि त्यांच्याच आवडीने मला जेवण चाखावं लागतं.. कधी तुझ्याकडे येऊन तुझ्या हातचा ठेचा आणि भाकरी खाईन असं झालंय बघ…
आई तुझी खूप खूप आठवण येते गं… कधी एकदा तुझ्या कुशीत येऊन मनसोक्त आनंद घेऊ असं वाटतयं गं…
आई खूप घुसमट होते गं माझी…
कोणी केली गं मुलींना दोन घरे असण्याची पद्धत, सासर आणि माहेर, एक पण घर तिचं आपलं होत नाही????
अगं इथं मला मुक्तपणे बोलता पण येत नाही गं, मला माझे निर्णय पण सांगता येत नाहीत गं… उंच भरारी घ्यायची पाहिलेली माझी स्वप्नं तर मला आठवत पण नाहीत गं…
दिवस कधी सुरू होतो आणि कधी संपतो हे पण समजत नाही आणि तरी सगळे म्हणतात तू कुठं आमच्यासाठी काय करतेस…
कुठं गेली माझी स्वप्नं, माझी जिद्द, माझ्या इच्छा??? मला काहीच आठवत नाही गं आई…फक्त तू आणि तुझी माया मात्र सारखी आठवते…..
------ आई मी तुझीच गं लाडकी
(जन्माला आलेल्या सगळ्या मुलींची अवस्था वरील लेखात व्यक्त केली आहे, पण आता काळ बदलला आहे फारच थोड्या मुलींची अशी अवस्था होते… पण दुःख मात्र सगळ्यांच सारखंच)