बालपण समृद्ध करणारी बडबडगीते व अभिनय गीते 20+

आजकाल सर्वच लहान मुले मोबाईल घेऊन काहीतरी बघत बसतात,गेम्स खेळतात..पण त्यांच्या बालपणी त्यांना आज बडबडगीते व अभिनय गीते माहिती नसतात..बडबडगीते लहान मुलांना योग्य संस्कार देऊन त्यांचे बालपण समृद्ध करतात.खूप वर्षांपूर्वी चांदोमामा भागलास काय? आभाळातून पडले कमळाचे फूल.. पप्पा गेले बंगलोरला अशी बडबडगीते लहान मुले खूप छान अभिनय करून म्हणून दाखवायची.तर अशीच दुर्मिळ होत चाललेली बडबडगीते व अभिनय गीते आज तुम्हांला माहिती होणार आहेत….

प्रारंभी विनंती

प्रारंभी विनती करू गणपती विद्या-दयासागरा

अज्ञानत्व हरोनि बुद्धि मति दे आराध्य मोरेश्वरा

चिंता, क्लेश, दारिद्र, दुःख अवघे देशांतरा पाठवी हेरंबा,

गणनायका, गजमुखा भक्ता बहू तोषवी

विनवणी

देवा तुझिया चरणी

नमितो अंतःकरणी

तुज आठवितो कृपासागरा

तुज विनवितो सांभाळी बाळाऽऽऽ

संध्या प्रार्थना

शुभं करोति कल्याणम्

आरोग्यम् धनसंपदाः

शत्रुबुद्धि-विनाशाय दीपज्योति नमोऽस्तुते।।

दिव्या दिव्या दीपोत्कार कानी कुंडले मोतीहार

दिव्याला पाहून नमस्कार ।।🙏

सदा सर्वदा

सदा सर्वदा योग तूझा घडावा।

तुझे कारणी देह माझा पडावा।

उपेक्षू नको गुणवंता अनंता।

रघुनायका मागणे हेचि आता।

जय जय रघुवीर समर्थ 🙏

प्रार्थना

प्रार्थना-देवाचे देणे

देवा तुझे किती सुंदर आकाश

सुंदर प्रकाश सूर्य देतो ॥१॥

सुंदर चांदण्या, चंद्र हा सुंदर

चांदणे सुंदर पडे त्याचे

सुंदर ही झाडे, सुंदर पाखरे

किती गोड बरे गाणे गाती ॥३॥

सुंदर वेलींची सुंदर ही फुले

तशी आम्ही मुले देवा तुझी ॥४॥

इतुके सुंदर, जग तुझे जर

किती तू सुंदर असशील देवा ।।५।।

-ग. ह. पाटील

चिऊताई

उठा उठा चिऊताई

सारीकडे उजाडले

डोळे तरी मिटलेले अजूनही

सोनेरी हे दूत आले,

घरट्याच्या दारापाशी डोळ्यावर झोप कशी ? अजूनही…

लगबग पाखरेही, गात गात गोड गाणे

टिपतात बघा दाणे, चोहीकडे

झोपलेल्या अशा तुम्ही, आणायचे सांगा कुणी?

बाळासाठी चारापाणी चिमुकल्या

बाळाचेही घेता नाव, जागी झाली चिऊताई

उडूनिया दूर जाई भूरऽऽ भूरऽऽ

-कुसुमाग्रज

कोंबडेदादा

कोंबडेदादा

कोंबडेदादा उठा… उठा…

पहाट झाली आरवत सुटा

जागा व्हायला लागला गाव

कुकुऽऽच् कू… करायचे राव

रोज पहाटे आरवत रहा

डोक्यावर तुरा मिरवत रहा

-कल्याण इनामदार

आंघोळ

न्हाऊ बाळा न्हाऊ, आंघोळीला जाऊ!

बशू बाई बशू, पाटावरती बशू!

बुड बुड बुडू, गोल गोल गडू!

फेस पहा फेस, ओले ओले केस!

घुशु घुशु घुशू, ओले अंग पुशू!

-मंगेश पाडगावकर

अडगूलं मडगूलं

अडगुलं मडगुलं

सोन्याचं कडगुलं

रुप्याचा वाळा

तान्ह्या बाळा तीट टिळा

बाळाचं जेवण

पापड खाल्ला

लोणचं खाल्लं

कर्रम् कर्रम्…

चटक मटक्…

भात खाल्ला

गुटू गुटू…

कढी प्यायली

भुरुक् भुरुक्…

चटणी खाल्ली

एक बोट…

भरलं बाळाचं

पोट पोट..

ढेकर आली

बाळ हसलं

खुदुक् खुदुक्…

-सरिता पदकी

करंगळी मरंगळी

करंगळी मरंगळी

मधलं बोट चाफेकळी

तळहात-मळहात

मनगट-कोपर

खांदा-गळागुटी-हनुवटी

भाताचं बोळकं

वासाचं नळकं

काजळाच्या डब्या

देवाजीचा पाट

देवाजीच्या पाटावर

चिमण्यांचा किलबिलाट…

आपडी थापडी

आपडी थापडी गुळाची पापडी

धम्मक लाडू, तेल काढू!

तेलंगीचे एकच पान

दोन हाती धरले कान!

चाऊ माऊ, चाऊ माऊ!

पितळीतले पाणी पिऊ!

हंडा पाणी गडप!

अपलम् चपलम्

अपलम् चपलम्

चम् चम् चम्

गुलाबाचे अत्तर

घम् घम् घम्

इवलेसे फूल

डुलु इलु डुलु

इवलासा थेंब

इवलीशी कुपी

छान छान छुक्

बाळ गेला झोपी

बोलू नका, शुक्

-राजा मंगळवेढेकर

चांदोमामा

चांदोमामा, चांदोमामा

भागलास काय ?

घरचा अभ्यास केलास काय?

चांदोमामा, चांदोमामा

लपलास काय ?

पुस्तक हरवून

बसलास काय?

चांदोमामा, चांदोमामा रुसलास काय ?

गणितात भोपळा

घेतलास काय?

-मंगेश पाडगावकर

थेंबा थेंबा

थेंबा थेंबा थांब थांब

दोरी तुझी लांब लांब

आकाशात पोहोचली तिथे कशी खोचली?

सर सर सर सर धावतोस सरीवर सरी गुंफतोस

सरी तुझ्या मोत्यांच्या रुप्याच्या की सोन्याच्या ?

सरी तुझ्या ओल्या गंगेत जाऊन न्हाल्या

-ताराबाई मोडक

ये ग ये ग सरी

ये ग ये ग सरी

माझं मडकं भरी

सर आली धावून

मडकं गेलं वाहून..

पळणारा भोपळा

कुडुम् कुडुम् सांडगा

पळत निघाला लांडगा

त्याच्या पायात बोचले काटे

पळता पळता कोल्हा भेटे

कोल्हा म्हणाला, पाहिलंस काय?

भोपळ्याला फुटले दोन पाय

पळत पळत भोपळा आला

लांडग्याने डोळा मोठा केला

टुणुक टुणुक् पळत निघाला

दोन पायांचा भोपळा पिवळा

लांडग्या-कोल्हयाची फजिती झाली

म्हातारी भोपळ्यातून पळून गेली

-उषा खाडिलकर

मनूताई

मनुताई, ऐक गडे

आळस कधी करू नये

बाळ दूध पिताना टक लावून पाहू नये…

मनुताई, ऐक गडे

मोत्यासंगे भांडू नये

बाळ खेळ खेळताना भीती त्याला दावू नये

मनुताई, ऐक गडे

चोरी कधी करू नये

चोरलेले दूध-तूप उपवासाला खाऊ नये

-राम गायकवाड

घोडा घोडा

चल रे घोड्या, टप् टप् टप्

मावशीच्या गावाला टप् टप् टप्

मावशीच्या घरी फणसपोळी काजू, आंबे, गोड शहाळी

तूही लाडका मावशीचा

तुला तोबरा काजूचा

चल रे घोड्या, टप् टप् टप्

मावशीच्या गावाला टप् टप् टप्

चल रे घोड्या, टप् टप् टप्

मामाच्या गावाला टप टप टप्

मामाच्या घरी गूळ-शेंगा, ऊसमळा नि पेरूच्या बागा

तूही लाडका मामाचा

तुला तोबरा शेंगांचा

चल रे घोड्या, टप् टप् टप्

मामाच्या गावाला टप् टप् टप्

चल रे घोड्या, परत परत

आईच्या गावाला उडत उडत

आई आम्हांला लागली भूक भूक

दे गं आई,

खूप खूप घोडू लाडका आईचा

तुला तोबरा खाऊचा

चल रे घोड्या, परत परत

आईच्या गावाला उडत उडत

-इंदिरा संत

वेडं कोकरू

वेडं कोकरू खूप थकलं

येताना घरी वाट चुकलं

अंधार बघून भलतंच भ्यालं

दमून दमून झोपेला आलं

शेवटी एकदा घर दिसलं

वेडं कोकरू गोड हसलं

डोकं ठेवून गवताच्या उशीत

हळूच शिरलं आईच्या कुशीत

-मंगेश पाडगावकर

सखुबाई

सखुबाई, सखुबाई चाललात कुठे?

निघाले बाबा शेताच्या वाटे!

सखुबाई घेतलंय न्याहरीला काही?

चटणी नि भाकरी लोटक्यात दही!

सखुबाई, सखुबाई पाटीत काय?

खेळतंय बाळ नाचवीत पाय!

सखुबाई इतकी कसली हो घाई?

बाळाच्या बाबांना भूक निघत नाही!

-शांता शेळके

एकदा

मुले झाली फुले

फुले झाली मुले

मुले बसली बागेत

फुले गेली शाळेत ॥१॥

भुंगा लागला गोल मुलांभोवती फिरू

फुले लागली शाळेत धडे पाठ करू||२||

भुंग्याला मुलांचा वासच येईना

फुलांचा धडा पाठच होईना ॥३॥

मुले बिचारी बागेत सुकली

फुले बिचारी बेरजा चुकली ॥४॥

बागेत मुलांचे तोंड झाले कडू

शाळेत फुलांना कोसळले रडू ॥५॥

-शांता शेळके

झाडावरून आंबा पडला

झाडावरून आंबा पडला

टुणकन् उडून टोपलीत बसला

फणसबुवा हळूच हसला

पोट धरून पेटीत बसला

फणसाची पेटी, आंब्याची टोपली

सरकत सरकत बोटीत बसली

भो भो भो भो वाजला भोंगा

उभा होता मुंबईचा टांगा

फणस-आंबे टांग्यात बसले

टक् टक् टक् टक् टांगा चाले

टांगा-मोटार झाली टक्कर

फणसबुवांना आली चक्कर

फणस गेला गडगडत

आंबा गेला धडपडत

आंबा झाला पिवळा पिवळा

फणसाचा झाला लोळागोळा

नको रे बुवा मुंबईची हवा

कोकण आपले बरे बुवा

-उषा खाडिलकर

इटुक्क मिटुक्क

इटुक्क मिटुक्क

चिंचेचं बुटुक्क

लाल लाल चिंच

तोंड झालं चुटुक्क

मीठ मसाला

कैरीची फोड

चन्या मन्या

आंबट गोड

-पद्मिनी बिनीवाले